धरणगांव प्रतिनिधी, येथील शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी आज संपूर्ण शाळेचा कारभार सांभाळला. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक – शिक्षिका व सेवक अशा सर्व भूमिका विद्यार्थ्यांनी पार पाडल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या विद्यार्थिनी मुख्याध्यापिका कु.चेतना जावरे होत्या. पर्यवेक्षक नंदिनी भोई, प्रमुख अतिथी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे होत्या. सर्व मान्यवरांच्या हस्ते चक्रधर स्वामी, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.विद्यार्थी शिक्षकांनी सर्व सन्माननीय गुरुजनांना महापुरुषांचे ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. शाळेला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांची प्रतिमा भेट दिली. यानंतर कोमल भोई व दुर्गेश महाजन यांनी वर्गशिक्षक पी डी पाटील यांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट दिली.
शिक्षक दिनाचे औचित्य साधुन आजच्या शाळेच्या विद्यार्थी मुख्याध्यापिका चेतना जावरे व पर्यवेक्षक नंदिनी भोई यांना पी डी पाटील यांच्याकडून महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचे अनमोल ग्रंथ भेट देण्यात आले. यानंतर जया सोनवणे व शितल भोई यांनी महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला. विद्यार्थी शिक्षक ललिता झेंडे, तेजस्विनी महाजन, कोमल भोई, दुर्गेश महाजन, रिषभ बोरसे, वादीश शिरसाठ, तनिषा चंडाले, सपना मराठे, सोनू कुंभार यांनी शाळा चालविण्याचा अनुभव कथन करून आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे व पी डी पाटील यांनी महापुरुषांचे जीवनपट उलगडून त्यांचे सामाजिक – शैक्षणिक कार्य सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा चेतना जावरे यांनी एका दिवसासाठी बनलेल्या मुख्याध्यापकाचे महत्व सांगितले. आज आम्ही सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेचे कामकाज पाहिले याचा सर्वांना मनस्वी आनंद आहे ही संधी आमचे मुख्याध्यापक जे एस पवार सर यांनी उपलब्ध करून दिली त्यांचे आम्ही सर्व विद्यार्थी ऋण व्यक्त करत शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी माळी, नंदिनी भोई व आभार कोमल भोई हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी डी पाटील,एस एन कोळी, सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.