अमळनेर येथील पुरवठा विभागात खाजगी एजंटांचा बेकायदा कारभार,  नागरिकांची होतेय आर्थिक लूट

अमळनेर: अमळनेर तालुक्यातील पुरवठा विभागात खाजगी एजंटांचा बेकायदा कारभार सुरू असून, नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या या विभागात खाजगी एजंटांनी धाडस दाखवत नागरिकांना शिधा कार्ड नवीनीकरण, नाव वाढवणे किंवा कमी करणे यासारख्या कामांसाठी मोठी रक्कम मागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ऑनलाइन कामकाजासाठीही नागरिकांना हजारो रुपये खर्च करावे लागत असल्याचे समोर आले आहे.

एनपीएच कार्ड धारकांना पीएचएच कार्ड मिळवून देण्यासाठीही एजंट पैसे घेत असल्याचे आरोप आहेत. पैसे न देणाऱ्या नागरिकांना विभागातल्या कर्मचाऱ्यांची खूप त्रासदायक स्थिती सोसावी लागत आहे. वशिला लावल्याशिवाय या विभागात कोणतेही काम होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

रेशन दुकानांमध्ये शिधा वाटप पद्धतीकडे दुर्लक्ष केले जात असून, विशेषतः शासनाच्या लाडकी बहिण योजनेत शिधा कार्ड आवश्यक असल्याने नागरिकांना नवीन कार्ड मिळवण्यासाठी एजंटांच्या दावणीला बांधून ठेवले आहे.

या सर्व प्रकरणांमुळे अमळनेर तालुक्यातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!