अमळनेर प्रतिनिधी, येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉल, प्रताप कॉलेज, अमळनेर, जळगाव येथे दिनांक 20 ते 22 सप्टेंबर 2024 दरम्यान 12 वी स्टेट ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पॅनक्रेशन चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध 20 ते 25 जिल्ह्यांतील 400 ते 500 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग, आणि पॅनक्रेशन या खेळांचा समावेश आहे. स्पर्धा कॅडेट, ज्युनियर आणि सीनियर अशा सर्व वयोगटांतील महिला व पुरुष खेळाडूंसाठी खुल्या आहेत.
ही स्पर्धा महाराष्ट्राच्या संघाची निवड चाचणी म्हणून आयोजित करण्यात येत आहे. निवडलेला महाराष्ट्र संघ 3 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान देहरादून, उत्तराखंड येथील मल्टीपर्पज हॉल, परेड ग्राउंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. याच राष्ट्रीय स्पर्धेतून बेल्ट रेसलिंग सीनियर वयोगटातील महिला व पुरुष खेळाडूंच्या एशियन बेल्ट रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे.
एशियन बेल्ट रेसलिंग चॅम्पियनशिप 18 ते 24 नोव्हेंबर 2024 दरम्यान कोहिमा, नागालँड येथे नागालँड सरकार आणि ऑल इंडिया ट्रॅडिशनल रेसलिंग अँड पॅनक्रेशन फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ सहभागी होणार आहे. तसेच, ज्युनियर वयोगटातील खेळाडूंसाठी उझबेकिस्तान, नुकूस येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिपसाठी मुला-मुलींचा संघ निवडला जाणार आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रताप कॉलेज, अमळनेर येथे आयोजित केला आहे.
अमळनेरमधील सर्व क्रीडा रसिक, खेळाडू, आणि क्रीडा संघटकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन या प्रतिष्ठित स्पर्धेची शोभा वाढवावी, अशी नम्र विनंती ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पॅनक्रेशन असोसिएशन चे अध्यक्ष सी ए तांबोळी,जळगाव जिल्हासचिव सचिन वाघ यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.याप्रसंगी राष्ट्रीय खेळाडू आदित्य बुक्की उपस्थित होते.
,