राष्ट्रीय शेतकरी दिन – आजचा बळीराजा ?

संपादकीय विशेष…

शेतकऱ्याला ‘जगाचा पोशिंदा’ असे म्हटले जाते. जगात शेतकरी नसेल तर मग आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ राहणार नाही. कारण, शेतकऱ्याने पिकवलेल्या धान्यामुळे, पिकांमुळे, आज आपल्याला जेवायला अन्न मिळते, हे कुणीच नाकारू शकत नाही. शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशात दरवर्षी २३ डिसेंबरला ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ साजरा केला जातो. आज राष्ट्रीय शेतकरी दिन आहे, या निमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांच्या योगदानानिमित्त कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला जातो. शेतकरी दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. भारताचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे कैवारी स्वर्गीय चौधरी चरणसिंग यांच्या जयंती निमित्त हा विशेष दिवस साजरा केला जातो. भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील ५० टक्क्यांहून अधिक लोकांच्या प्रमुख उपजिविकेचे साधन शेती आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि देशात शेतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय शेतकरी दिनाचा इतिहास सांगायचे झाल्यास २००१ मध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय चौधरी चरणसिंग यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या स्मरणार्थ हा राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. आणि तेव्हा पासून दरवर्षी २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. भारतातील शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळे, शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. ते स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या आणि परिस्थितीची चांगली जाण होती, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी अनेक कामे केली होती. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे सर्वसामान्यांच्या ताटात अन्न येते आणि शेतकऱ्यांमुळेच आज आपण दोन घास सुखाचे खातोय, हे आपल्याला मान्य करावेच लागेल. त्यामुळे, शेतकऱ्यांचा आदर करणे आणि देशात शेतीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य हेतू आहे.

मात्र आज या बळीराजाची दशा अतिशय वाईट आहे.रोज कुठेना कुठे शेतकरी आत्महत्या करीत आहे.त्याचे कुटुंब उघड्यावर पडत आहे.त्याची शेत जमिन कवडीमोल भावाने धनदांडगे अरोबडत आहेत.त्याच्या आत्महत्यानां ही व्यवस्थ कलंकित करीत आहे.याला कारण म्हणजे सरकारचे शेतकऱ्यांच्या शेतमाल बद्दलचे धोरण होय.त्यांनी घाम गाळून पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव देत नाही.साधा उत्पादन खर्च सुद्धा मिळत नाही.त्यामुळे तो कर्जाच्या खाईत लोटला जात आहे.यामुळे बँक अथवा सावकार त्यांच्या बोखांडी बसत आहेत.कर्ज बाजारी झाल्याने त्याची सामाजिक पत प्रतिष्ठा ढासळत चालली आहे.यामुळेच की काय देशाचा पोशिंदा बळीराजाला आत्महत्या कडे वळावे लागत आहे.असेच चालले तर देशात अराजकता माजल्या शिवाय राहणार नाही.

स्वाभिमानी शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या हक्का साठी आंदोलन करत आहे.मात्र सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन बळाचा वापर खदडण्याचे काम करत आहेत.शेतकऱ्यांना नक्षलवादी, उग्रवादी ठरवण्याचा केविलवाला प्रयत्न करीत आहे.मात्र देश भरात शेतकऱ्यांच्या स्वाभिमानी आंदोलनाला जनमानसतून मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत आहे.देशातील बहुतांश नागरीक शेतकऱ्यांच्या बाजूने असताना मात्र सरकार लोकसभा व राज्यसभेतील खासदारांच्या संख्येवर शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे बनवत आहे.यामुळे देशात उद्रेक वाढत आहे. नेपाळ अथवा बांगलादेश सारखा उद्रेक होणयाची दाट शक्यता नाकारता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होत असल्याची चर्चा सुज्ञ नागरिक करतांना दिसतात.

आपला देश सुजलाम सुफलाम करायचा असल्यास देशाचा पोशिंदा बळीराजाच्या शेतमालाचा भाव ठरविण्याचा मुभा दिली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!