अमळनेर प्रतिनिधी , येथील राजमुद्रा फॉउंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी पत्रकार बांधवांशी वैचारीक संवाद साधता यावा,या हेतूने “जागर लोकशाहीचा… महाराष्ट्र धर्म जागवू या…महाराष्ट्र धर्म वाढवू या…. ” या विषयावर स्तुत्य उपक्रम शहरातील नर्मदा रिसॉर्ट येथे आयोजित केला होता.सदर कार्यक्रम हा पत्रकारांसाठी वैचारिक मेजवानी ठरला.
सविस्तर वृत्त असे की, अशांततामय व भययुक्त वातावरणात पत्रकारांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. पत्रकार आपल्या लेखणीतून नागरिकांमध्ये बदल घडवून समाजात शांतता व सलोखा प्रस्तापित करू शकतो ही ताकद ओळखून राजमुद्रा फॉउंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी तालुक्यातील पत्रकार बांधवांना निमंत्रीत करून एक आगळा वेगळा कार्यक्रम नर्मदा रिसोर्ट येथे घडवून आणला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दर्शन पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन दयाराम पाटील यांनी केले.
कार्यक्रमांच्या सुरूवातीला राजमाता आईसाहेब जिजाऊ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहु महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्णहार घालून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी विचारमंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत हे राजमुद्रा फॉउंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी पुष्पगुच्छ न देता वैचारीक पुस्तक हे मान्यवरांना भेट देवून स्वागत केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इतिहास अभ्यासक प्रा.डॉ. लीलाधर पाटील यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितले की,
लोकशाहीत “चौथा स्तंभ अर्थात पत्रकारिता” हे आज गुळगुळीत वाक्य बनले आहे.सध्याचे राजकारणी लोकांकडे फक्त मतदार या नजरेतून बघत असतात तर पत्रकार हे आपल्या लेखणीतून सातत्याने लोकांनां तुम्हीं या देशाचे नागरिक असल्याची जाणीव करून देत असतात. यामुळे सर्व सामान्य लोकांना पत्रकारांचा आधार असतो. पत्रकारांची भूमिका लोकशाही टिकवण्याची असली पाहिजे. सत्ते सह राजकारण्यांना पत्रकारांची भीती वाटली पाहिजे,पत्रकाराने प्रश्न विचारले पाहिजे आणी ते त्यांनी कार्य भूतकाळातही केले आहे व ते आजही अविरतपणे करत आहेत.उदाहरण द्यायचे झाले तर मा. पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनाही लोकशाही धोक्यात असतांना जेएनयुच्या गेटवरच सीताराम येचुरी यांनी प्रश्न विचारले व त्यांना ठणकावून सांगितले की जरी हे विद्यापीठ तुमच्या वडिलांच्या नावाचे असेल तरी आम्हीं तुम्हाला गेटच्या आत येऊ देणार नाही आणि त्यांनीही त्या पत्रकारांचा सन्मान ठेवूनच त्या गेटवरून परत निघाल्या होत्या.परंतु आज ही प्रश्न विचारल्यास देशद्रोही म्हणून घोषित केलं जातं आहे.पत्रकारांची मुसक्या आवळल्या जात आहे. लोकशाही जिवंत आहे का? असा सवालही मांडला.
लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी पत्रकारांची भूमिका ही महत्वाची आहे व हे फक्त आजचा ग्रांऊड लेव्हलचा पत्रकाराच करू शकतो .कारण पत्रकार हा समाजाच्या ग्राउंड लेव्हलला जाऊन समाजाचे प्रश्न मांडतो.
सध्याच्या शासकीय धोरणामुळे समाजात निर्माण होणाऱ्या प्रश्नावर, समस्यांवर वास्तववादी विविध दाखले त्यांनी यावेळी दिले.पत्रकारांच्या लेखणीत समाज, राजकीय व्यवस्था बदलण्याची ताकद असते. पत्रकारांनी आवाज उठविल्यास त्यांना बॅकअप देणारी मजबूत यंत्रणा असावी असेही त्यांनी सांगितले आणि अशी यंत्रणा ही राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळी अस्तित्वात असलेल्या पत्रकारांना दिली होती.
एका बातमीमुळे छोटे बातमीपत्र हे एका मोठया बातमीपत्रांत रुपांतरीत होऊ शकते. लोकशाही बळकटीकरणांसाठी पत्रकारांनी सत्तेला प्रश्न विचारले पाहिजे आणी प्रश्न विचारणं गैर नाही. जर हे प्रश्न विचारले गेले नाही तर येणारी पिढी ही बरबाद होवू शकते यांचीही कल्पना त्यांनी पत्रकारांना दिली. प्रश्न विचारण्याची परंपरा ही आपल्या संस्कृतीमध्येच आहे यांचे दाखलेही त्यांनी इतिहासाच्या विविध घटनांवरून दिले. सध्याच्या दंगल सदृश्य परिस्थितीत अमळनेर जर कोणी शांत केले असेल तर ते फक्त पत्रकारांनी केले, असे बोलून त्यांनी पत्रकार बाधंवांचे कौतुक केले.
सदर कार्यकमाचे आभार प्रदर्शन राजमुद्रा फॉउंडेशनचे अध्यक्ष श्यामभाऊ पाटील यांनी मानले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजमुद्रा फॉउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी जातीने लक्ष देवून कार्यक्रम यशस्वी केला.