अमळनेर प्रतिनिधी, येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने “उद्यमशीलता आणि नवनवीन व्यवसायांचे स्टार्ट अप” या विषयावर एक दिवसीय अतिथी व्याख्यान दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ ते २:३० दरम्यान पूज्य साने गुरुजी सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
प्रस्तुत व्याख्यानासाठी अतिथी व्याख्याता म्हणून श्री.दिपक करंजीकर (मुंबई) हे उपस्थित होते. श्री.करंजीकर हे एक बहुआयामी व्यक्ति असून ते प्रख्यात व्यवस्थापनात निपुण, लेखक, सामाजिक-आर्थिक तज्ञ, आंतरराष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापन तज्ञ आणि प्रगल्भ वक्ते आहेत. सरांना ७१ देशांतील, सीनियर लेव्हल मॅनेजमेंट आणि बिझनेस कन्सल्टेशनसह वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीचा २८ वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. सरांनी जागतिक स्तरावर युरोप, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि यूएसएसाठी क्रॉस फंक्शनल संघांचे सक्रिय नेतृत्व केले आहे.
यावेळी अतिथींचे स्वागत खानदेश शिक्षण मंडळांचे कार्योपाध्यक्ष सीए निरज अग्रवाल यांनी केले. प्रा.प्रतिक्षा शर्मा यांनी अतिथींचा परिचय करून दिला. प्रस्तुत व्याख्यानात श्री.दिपक करंजीकर यांनी *उद्यमशीलता आणि नवनवीन व्यवसायांचे स्टार्ट अप* या विषयी मुलांना मौलिक असे मार्गदर्शन केले. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनास वर्तमानाची सांगड घालत उद्यमशिलता व भविष्यातील संधी या विषयावर विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
*विद्यार्थ्यांनी स्वतःवर अतूट श्रद्धा ठेवावी* :
श्री दिपक करंजीकर आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात मराठी भाषेचा पाया रचला. भारताचा इतिहास अभ्यासपूर्ण उलगडून दाखविले,आज समाजजीवनात ग्रामीण भागात काही घडण्याची अपेक्षा आहे जे इतर ठिकाणी आढळत नाही.प्रताप एक समृद्ध महाविद्यालय आहे म्हणून *विद्यार्थ्यांनी स्वतः वर अतूट श्रद्धा ठेवावी* तसेच चांगली भावना,ऊर्जा,धारणा अंगीकारावे,असे करताना स्वतः वर श्रद्धा ठेऊन आपली तुलना इतरांशी न करता वाटचाल सुरू ठेवावी.समाजात पेटंटचे कौशल्य असणारे व्यक्ती हे नवीन बौद्धिक संपदा अधिकार संकल्पने पासून अज्ञात आहेत परंतु त्यांच्यात अशा प्रकारचे नवनवीन कौशल्य व गुण आढळतात म्हणून आज ज्ञानाच्या कक्षा ह्या विस्तारत आहेत.या संबंधी मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमासाठी बी.एस्सी, एम. एस्सी, बी.सी.ए., तसेच वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण बी जैन सर यांनी केले. प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन, संस्थेचे सहसचिव डॉ.धीरज वैष्णव, डॉ.मुकेश भोळे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. पुष्पा पाटील, प्रा.अमित शिंदे, प्रा. सुधाकर बाविस्कर, श्री.दिपक चौधरी तसेच संगणकशास्त्र विभाग व कॉम्प्युटर अप्लिकेशन विभागातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.