अमळनेर प्रतिनिधी,शहरात दोन धर्मात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असली तरी या भूमीला संताच्या विचारांचा प्रभाव असल्याने लवकरच सामाजिक सलोखा निर्माण होणार असल्याचे अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत विश्वास व्यक्त केला.
बोटा वर मोजता येतील अश्या मूठ भर लोकांनी जातीयतेढ निर्माण होईल अशा अनेक हालचाली केल्या आहेत. समाजद्रोही लोकांकडू्न ही कृत्य होत असल्याने अमळनेरची शांतता व सुव्यवस्था खराब होईल अशी परिस्थिती सध्या अमळनेरात आहे. म्हणून काल शनिवारी अमळनेर पोलीस प्रशासनाने पत्रकार परिषद घेतली होती. यातून अमळनेरकरांनी शांतता राखावी व खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
अमळनेर ही संतांची भूमी आहे मात्र सध्या अमळनेर तालुक्यात काही लोकं धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा गैरकृत्य करणाच्यांना पाठीशी घातले जाणार नाही व जे दोषी नाहीत त्यांच्यावर अन्याय देखील होणार नाही,अमळनेर आपले असून त्याला आपल्यालाच सांभाळायचे आहे असे भावनिक आवाहन याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळ्कर यांनी अमळनेरकरांना केले आहे.
सुनील नंदवाळकर यांनी तरुणाईला उद्देशून बोलताना सांगितले की सध्या अमळनेर मधील एक तरुण एसआरपीएफ दलाची परीक्षा पास झाला असून मात्र त्याच्या वर दंगलीत सहभागी असल्याचा गुन्हा दाखल असल्याने अडचणी निर्माण होत आहे,यामुळे त्याचे आयुष्य विस्कळित होऊ शकते.आमच्या स्तरावरून त्याला मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशी वेळ शिक्षित तरुणांवर येऊ नये.याकरिता तरुणांनी आपले ध्येय हे प्रगतीचे व देश विकासाचे ठेवावे.आपल्याला जन्म दिलेल्या आई वडिलांचे स्वप्नपूर्ती साठी प्रयत्नशिल राहावे,जाती – धर्माच्या वादात नपडता आपले करिअर करावे.या शिक्षणाच्या भूमीतून सुपुत्र जन्माला यावा, अशी अपेक्षा सुनील नंदवाळकर यांनी व्यक्त केली.
पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी सांगितले की,माझ्या उभ्या सर्व्हिस मध्ये सकारात्मक पत्रकारिता फक्त अमळनेर मध्ये अनुभवला मिळाली.दंगल सदृश्य परिस्थिती हाताळण्यात येथील पत्रकारांची अहम भूमिका आहे.येथील पत्रकारांचे कौतुक पोलिस जिल्हा अधीक्षक रेड्डी यांनी स्वतः फोन द्वारे केले.