अमळनेर प्रतिनीधी येथील राज्यातील अंगणवाडी कर्मचारी,आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनात भरीव स्वरूपाची वाढ करून सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करावी तसेच गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागु करावी.गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना भाऊबीज लागु करावी.
यांसह अन्य प्रलंबित मागण्यांबाबत दोन्हीं संघटनांतर्फे गेल्या वर्षांपासून आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. परिणामी या पाठपुराव्याला यश आले असून आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात प्रत्येकी पाच हजार रुपये मानधनवाढीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यांसह राज्यांतील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी आणि ७२ हजार आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना त्याचा फायदा होणार असल्याने तळागाळात महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्याअनुषंगाने आज दोन्ही संघटनांतर्फे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.श्री.अनिल दादा पाटील यांचा अमळनेर येथील निवासस्थानी राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी प्रतिनिधींनी पुष्पगुच्छ देऊन वरील कर्मचारी प्रतिनिधींनी छोटेखानी सत्कार करून शासनाचे आभार मानले.
याप्रसंगी श्रीमती सुलोचना पाटील,वैशाली ठाकरे,सुनंदा पाटील,सरला पाटील,संगिता पाटील,अनिता पाटील,चंदन पाटील,पुष्पा पाटील,आशा पाटील,शैला सोनवणे,प्रतिभा कोळी यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी,गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.