मुंबई प्रतिनिधी ,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दीक्षाभूमी ते मंत्रालय काढलेल्या राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रेचे फलित मिळाले असून महायुती सरकारने पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी २ स्वतंत्र आर्थिक महामंडळाची गुरूवारी घोषणा केली आहे. सरकारच्या निर्णयाचे पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी स्वागत केले असून राज्यभरातील संघाच्या पत्रकार सदस्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला आहे. वसंत मुंडे यांनी दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी तब्बल ६ हजार किमी अंतराची पत्रकार संवाद यात्रा काढून पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकार आणि समाजाचे लक्ष वेधले होते. अखेर या लढ्याला यश आले आहे.
महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत पत्रकार आणि विक्रेत्यां साठी स्वतंत्र दोन महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा मागील महिन्यात झाली.
मुंबईत यात्रेच्या समारोपाला राज्य सरकारच्यावतीने मंत्री मंगल प्रसाद लोढा आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावून महायुती सरकार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मागण्या बाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले होते. लोकशाही प्रणालीत पत्रकार हा समाजातील प्रमुख घटक आहे. पत्रकार हा आर्थिक पातळीवर कसा वंचित आहे, याच्या अनेक कहाण्या पत्रकार संवाद यात्रेतून पुढे आल्या. पत्रकार संवाद यात्रेत ठिकठिकाणी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी लावून धरली होती. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला होता. सत्तारूढ महायुती सरकारने यावर सकारात्मक विचार करून मंत्रिमंडळाने बैठकीत पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र २ आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली, हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या आंदोलनाचे, दीक्षाभूमी ते मंत्रालय या राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रेचे फलित असल्याने राज्यभरातील पत्रकारां कडून या निर्णयाचे उस्फुर्त स्वागत होत आहे.