🪔🪄🪔🪄🪔🪄🪔🪄🪔
*…मोठ्या मनाची दीपावली…*
आमच्या इथे नव्या पेठेत कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे. घरच्यांसोबत तिथे काल दुपारी गेलो होतो. मी केवळ न्याहाळत उभा होतो नि बाकी मंडळी खरेदी करत होती. तालुक्याच्या ठिकाणापासून दूर असलेल्या एका खेड्यातलं कुटुंब खरेदीसाठी तिथं आलेलं. थोरला मुलगा विशीच्या आतला, धाकटा शाळकरी पोर आणि शाळकरी मुलगी यांच्यासोबत त्यांचे आईवडील होते.
आईच्या अंगावरची साडी साधारण होती, बापाचे कपडे बिनइस्त्रीचे चुरगळलेले. कॉलर आणि बाहीजवळ विरळ झालेला बुशशर्ट, पँटीचे अल्टर केलेले मार्क रंग फिकट झाल्याने स्पष्ट दिसत होते. (REPOST)
मुलीनेही जेमतेम साधा ड्रेस घातलेला. मोठ्या फुलांची डिझाइन असलेला, अगदी गावाकडच्या बहुतांश मुली घालतात तसा पॉलिस्टर टाईपचा. धाकट्या शाळकरी मुलाच्या अंगावरचा शर्ट बऱ्यापैकी जुना होता. विशीतला मुलगा बहुतेक शिकायला परगावी असावा आणि तो दिवाळीसाठी गावी आल्यावर ते इकडे सोलापूरला खरेदीला आलेलं. त्याचे कपडे ठीकठाक होते पण तेही जुनेर वाटावे असेच होते.
त्यांच्याजवळची पिशवी खताच्या पॉलिथिन बॅगची होती आणि तळहात मातकट होते म्हणजे ते शेतकरी कष्टकरी कुटुंब होतं. मुलगी आईला आधी साडी घे म्हणत होती तर थोरला पोरगा आधी अण्णांना कपडे घ्या म्हणत होता. धाकटा म्हणत होता आधी दादाचे कपडे घ्या.
बाप म्हणत होता, ‘आधी पोरांचे कपडे मग शांतेसाठी (बहुतेक शांता हे त्या माउलीचे नाव) साडी घेऊ. ‘कुठलेही कपडे समोर आणून उघडले की ते सगळेच एकमेकांच्या नकळत किंमतीचे लेबल पाहत होते. किंमतीचे अंक इंग्रजीत होते मात्र अक्षरओळख सगळ्यांना असावी, त्या किंमतीचे प्रतिबिंब त्यांच्या भेदरलेल्या चेहऱ्यावर उमटत होते. मध्येच आई बोलली की, ‘जरा चांगलेच दाखव बाबा पण इतके महागाचे नको दाखवू!‘ तिने तसे म्हणताच बापाने पोरांच्या नकळत तिचा हात हळूच दाबला नि असे बोलू नकोस म्हणून खुणावले. ती मौन झाली.
बारकं पोरगं भिरभिरल्या डोळ्यांनी त्या चकचकीत दुकानातल्या सर्व कपड्यांना खिळल्यागत पाहत होतं. तिथला चकचकाट पाहून मुलगी तर अचंबित होऊन गेलेली.पुरती स्तब्ध झालेली.
मोठा मुलगा हुशार होता. त्याने आधी लहान्या बहिणीसाठी ड्रेस पसंत करायला लावला. धाकट्या भावाच्या पसंतीचा ड्रेस घेतला नि आईच्या मागे लागला साडी पसंत कर! ती बाई आवंढे गिळत होती. मुलांचा बाप मनातल्या मनात आकडेमोड करत होता नि तो कोवळा तरुण डोळ्यातली स्वप्ने गोठवत आईबापाचे डोळे वाचत होता!
त्या डोळ्यात दिसत असलेली कुतरओढ नि त्यांचं अगतिक असणं त्याला सहज वाचता येत होतं! पोरगं ऐकेना म्हटल्यावर त्या माऊलीने नकळत मान मागे घेऊन पदराने डोळयांच्या कडा पुसल्या. नेमकं त्याच वेळी मुलीने आईला पाहिलं. तिने काय ते ओळखलं.
“अण्णा मला काय बी नगं!” म्हणून ती बापाला बिलगली!
इतक्या गर्दीतही तो बापमाणूस गहिवरून गेला.पोरीला कवटाळून तिचे मुके घेऊ लागला! त्या क्षणी त्या दुकानात अनेक कुटुंब आणि अनेक माणसं होती, पण त्या सर्वात श्रीमंत कुटुंब ते होतं!
एकमेकांच्या मनातलं ओळखण्याची नि त्याग करण्याची श्रीमंती त्यांच्याकडे होती! गरिबी माणसाला खूप काही शिकवून जाते! इच्छांना मुरड घालण्याचे कसब गरीब असणाऱ्यास जन्मतःच असते!
त्या कुटुंबाकडे पाहताना नकळत माझे आई वडील आठवले!
घरादारासाठी खरेदी करताना स्वतःला कपडे न घेणारे, मुलांसाठी मन मारणारे आईवडील! जगात कुठल्या बापाचा खिसा कधी रिकामा राहू नये नि कुठल्या आईला तिचे मन मारावे लागू नये! कारण याचे शल्य आईवडीलांच्या जाण्यानंतर अणकुचीदार होत जाते!
तिथे असलेल्या त्या कुटुंबाच्या कर्त्या पुरुषात आपल्यापैकी कित्येकांच्या वडिलांचे बिंब दडून होते नि कित्येकांच्या इच्छा दफन होत्या!
संवेदनशील असणं वाईट असतं!
अशी माणसं कधी कुठं दिसली की वाटतं आपल्याकडे खूप सारे पैसे असले पाहिजेत म्हणजे आपण यांना सढळ हाताने मदत करू शकू!
पण सगळीच माणसं अशी मदत घेत नाहीत कारण ती हतबल असली तरी हरलेली नसतात आणि जी माणसं हरलेली नसतात तीच माणसं नियतीच्या छातीवर पाय देत विजयी होतात!
हे कुटुंबही त्यांच्या जगण्याच्या लढाईत जिंकायला हवं!
अजूनही ते कुटुंब नजरेआड होत नाहीये!
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*…दिपावली निमित्त”करडी नजर न्युज च्या चोंखंदळ वाचकांना” हार्दिक शुभेच्छा…*
🪄🪄🪄🪄🪄🪄🪄🪄🪄
✍🏻 *प्रा डॉ विजय गाढे*✍🏻
*मुख्य संपादक,करडी नजर न्युज*
*उपाध्यक्ष,खानदेश विभाग,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई*