अमळनेर येथील माजी आमदार तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचे पती साहेबराव पाटील यांनी एक जनहितार्थ प्रसिद्ध पत्रकातून डिसेंबर २०१६ ते डिसेंबर २०२१ मधील पालिकेचा पाच वर्षांचा कालावधी आणि तदनंतर जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीतील पथदिवे थकीत बिल ,पाणीपुरवठा थकीत बिल आणि बिगर सिंचन पाणी पट्टी बिल यातील मोठी तफावत असलेली आकडेवारीच प्रसिद्ध करून पालिकेच्या सुरू असलेल्या कारभारावर नागरिकांचे लक्ष वेधून खळबळ उडवली आहे.
जनहितार्थ प्रसिद्ध केलेल्या या पत्रकात म्हटले आहे की शहर पाणी पुरवठा योजनांच्या बिलांबाबत लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण ६१ वीज देयकांचा सातत्याने १४ कोटी ६५ लाख २० हजार २७० रुपये भरणा केला आहे. तर जानेवारी २००३ पासून ते नोव्हेंबर २०१६ पर्यंतच्या थकबाकी पैकी ५ कोटी ७३ लाख८३ हजार २११ रुपये भरणा केला होता. म्हणजे पाच वर्षांच्या कालावधीत थकबाकीसह एकूण भरणा २० कोटी ३९ लाख ४३ हजार ४८१ रुपये भरणा केला आहे.
मात्र नंतरच्या तीन वर्षांच्या प्रशासकीय कालावधीची तुलना करताना त्यांनी म्हटले आहे की जळोद येथील पाणीपुरवठा योजना देयक फेब्रुवारी २०२५ अखेर मुद्दल ,व्याज व दंड सह एकूण १५ कोटी ७३ लाख ५७ हजार ३३० रुपये आहे. गांधली येथील पंप हाऊस चे वीजबिल देयक फेब्रुवारी २०२५ अखेर मुद्दल ,व्याज आणि दंड सह १५ कोटी ०९ लाख ०६ हजार ३८० रुपये तर कलाली डोह पाणीपुरवठ्याची देयकाची मुद्दल व व्याजसह थकबाकी फेब्रुवारी २०२५ अखेर १ कोटी ३१ लाख ६९ हजार ५७० रुपये आहे. तसेच जळगाव पाटबंधारे विभागाचे बिगर सिंचन पाणी पट्टी देयके डिसेंबर २०२४ अखेर ३ कोटी ९२ लाख ७५ हजार रुपये थकबाकी होती. तर फेब्रुवारी २०२५ अखेर पथदिव्यांचे वीजबिल देयकाचे थकबाकी ८२ लाख १८ हजार ९३० रुपये होती. म्हणजे फेब्रुवारी २५ अखेर फक्त तीनच वर्षात पालिकेकडे वीजबिल पाणी पट्टी देयक मुद्दल ,व्याज आणि दंड अशी एकूण थकबाकी ३६ कोटी ८९ लाख २७ हजार २१० रुपये आहे. हे प्रसिद्धी पत्रकात निदर्शनास आणून दिले आहे.
माजी लोकनियुक्त सौ पुष्पलता पाटील यांचा पाच वर्षांचा कालावधी आणि तीन वर्षे प्रशासकाचा कालावधी यातील भरणा ,थकबाकी याची तुलना करून त्यांनी प्रशासन हाताळण्याची कसब आणि कारभाराची तुलना केली आहे. आणि म्हणूनच त्यांनी या पत्रकात तुलना विरोधकांना एक प्रकारे अवहेलना करू नका मात्र तुलना करा असे आवाहनच केले आहे.