संताच्या भूमीत जातीय तणाव असतानां लोकप्रतिनिधी सह राजकीय पुढारी मूग गिळून गप्प ?

संपादकीय…….

अमळनेर संत सखाराम महाराज समाधी मंदिर , अंबर्शी टेकडी विष्णुदेवाचे एकमेव मंदिर , अतुर्ली रंजाणे येथील कार्तिक स्वामी मंदिर , चांदणी कुऱ्हे येथील सती माता मंदिर ,अतिप्राचीन अतिजागृत भारतातील एकमेव मंगळग्रह मंदिर,कपीलेश्र्वर मंदिर आदी धार्मिक वारसा आहे.सुमारे दीडशे-पावणेदोनशे वर्षापुर्वी अमळनेर येथे श्री सखाराम महाराज या नावाने एक प्रसिद्ध साधू होऊन गेले. त्यांच्या स्मरणार्थ बोरी नदीच्या पात्रात त्यांची समाधी बांधली आहे. वैशाख महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. श्री संत सखाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे व त्यांच्यानंतर चालत आलेल्या परंपरेमुळे अमळनेरला एक क्षेत्र म्हणून त्यावेळी मिळालेली प्रसिद्धी आज कायम असुन ते खानदेशचे पंढरपूर समजले जाते.तसेच मातृ हृदयी पूज्य साने गुरुजी व क्रांतिकारी उत्तमराव पाटील,क्रांती विरंगणा लीलाताई पाटील यांची कर्मभूमी म्हणून जागतिक स्तरावर नाव लौकीक असलेल्या पावन भूमीत जातीय तणाव म्हणजे अमळनेच्या इतिहासाला काळीमा फासणारी बाब आहे.

खानदेशातील एक महत्त्वाचे गाव म्हणजे अमळनेर. या शब्दाची उत्पत्ती अमळनेर म्हणजे मलविरहीत ग्राम होय.पण सध्या जातीय द्वेषरुपी विचारांची घान काही जातीयवादी विचारधारेचे लोक अमळनेर नगरीत पसरवू पाहत आहे.ज्या मातीने “जगाला प्रेम अर्पावे ” चा संदेश दिला त्याच भूमीत जातीयतेचे वारे वाहू लागले आहे.धर्माच्या नावावर माणुसकीला काळीमा फासणारी घटना सातत्याने घडतांना दिसत आहे.

या मातीने अनेक साहित्यिक,कवी,अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पुढारी दिले आहे.त्यांनी सातत्याने या नगरीचे नाव उंचावण्यासाठी अथक परिश्रम सुध्दा घेतलेले पहायल मिळते. अनेकांची या मातीशी नाळ जुळली आहे. या मातीत जन्मलेला व्यक्ती जरी तो वास्तव्याला बाहेर गावी असला तरी तो या नगरी साठी काही देणे लागतो,या भूमिकेतून जबाबदारी पार पाडत आहे.

मात्र काही दिवसांपासून या नगरीत जातीय द्वेष आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.मूठ भर लोक सामाजिक सलोखा बिघडण्याच्या कामी असल्याचे दिसून येत आहे.एकमेकांच्या सुख दुःखात सदैव सहभागी होणारे आज मात्र एकमेकांच्या मुळावर उठल्याचे चित्र निर्माण झाले आहे.दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे सर्व सामान्य नागरिक,व्यापारी वर्ग,शिक्षणाला आलेला विद्यार्थी ,पोटाची खळगी भरण्यासाठी घरा बाहेर पडणारा कामगार, धंदेवाले,धार्मिक आस्था जपण्यासाठी शहरात येणारे भाविक,कुटुंबात रोज लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी घरा बाहेर पडणारी माय माउली आदी भय भित झाले असताना सामाजिक कार्यकर्ते सह राजकीय पुढारी मात्र याबाबत एक चकार शब्द ही उच्चारत नाही.याला विरोध करण्यासाठी धजावत नाही.तसेच लोकप्रतिनिधी सुध्दा या तणाव ग्रस्त असलेल्या परिस्थीत वर चकार शब्द बोलायला तयार नाही.अजून हि ते सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी लोकांना आवाहन करताना दिसले नाही.कदाचित येणाऱ्या निवडणुका डोळ्या समोर असल्याने त्यांनी मूग गिळून बसले असावे .पण ज्यांच्या कडे मत मागायला जायचे आहे त्या मतदारांना जातीय तणाव मुक्त वातावरण निर्माण करून देण्याचे कर्तव्य पार पाडत नसल्याने मतदानावर याचा परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही.याची कल्पना कदाचित त्यांना नसावी.

नागरिकांचा आशेचा किरण……

जातीयतेच्या ज्वालेने शहर होरपळून टाकणाऱ्यांच्या नांग्या वेळीच ठेचण्याचे काम निष्पक्षपणे तोडके संख्याबळाच्या जोरावर करणारे पोलिस प्रशासन हे नागरिकांच्या कौतुकाचे धनी होत आहे.कोणत्याच राजकीय दबावाला बळी न पडता समाज कंटकांच्या मुसक्या आवळल्या जात असल्याने त्यांच्या वर अमळनेर चे सुज्ञ नागरिक अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.पोलिस प्रशासन हेच अमळनेरकराना भय मुक्त वातावरण निर्माण करण्यात उच्च कोटीचा प्रयत्न करत असून स्थानिक राजकीय पुढारी मात्र मूग गिळून बसल्याची जन भावना निर्माण झाली आहे.

सुज्ञ नागरिक,पत्रकार व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन सामाजिक सलोखा राखण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यास सुरूवात केल्याने लवकरच शहरात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल,यात किंचित ही शंका नाही.

चला तर एक अमळनेरकर म्हणून जातीय सलोखा निर्माण करण्याची शपथ घेऊन या संताच्या भूमीला जातीयतेची काळीमा फासला जाणार नाही याची काळजी घेऊया.

संत सखाराम महाराज व मातृ हृदयी पूज्य साने गुरुजींनी दिलेला समता-बंधुतेचा संदेश मना मनात रुजवूया.अमळनेर नगरीला भय मुक्त करूया.

अमळनेर या जागतिक धार्मिक स्थळाला काळीमा फासणाऱ्यानां वेळीच आवर घालुया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!