विशेष लेख….
इतिहास म्हणजे त्या त्या काळातील विशेष व्यक्ती, समाज,वस्तू,घटना, प्रसंग की या सर्वसामान्यांपेक्षा वेगळा असून त्यांची नोंद घेण्यास त्या काळातील अभ्यासकांना सहजपणे भाग पडते त्यांच्या अस्तित्वामुळे तत्कालीन समाजाला निसर्गाला एक वेगळ्या प्रकारची दिशा स्वरूप प्राप्त होत असते. त्या व्यक्ती समाज, वस्तू,घटना, प्रसंग, एखाद्या विद्युल्लते सारख्या चमकून टाकतात त्या ‘यावतचंद्र दिवाकरौ’ इतिहास बद्ध होऊन जातात. ‘इतिहास म्हणजे थोर व्यक्तींची चरित्रे व कामगिरी’श्रीमंत प्रताप शेठजी हेही असेच एक व्यक्तिमत्व होऊन गेले की ज्या व्यक्तिमत्त्वाने तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये एक नाविन्यपूर्ण दिशादर्शक असे कार्य केलेले आहे. अत्याधुनिक अशा यंत्रसामुग्रीयुक्तने सुरू केलेल्या कृषी आधारित वस्त्रोद्योग ज्यामुळे शेतकरी व कामगार वर्ग या दोघांनाही त्यांनी न्याय दिला. त्याच बरोबर कृषी मालास भाव आणि बेरोजगारांना काम देऊन समाजात महत्त्वाचे काम केले. आधी-व्याधींनी खंगून खंगून घरात व गल्लीत बोळात मृत्युपंथाला लागलेल्यांना मोफत वैद्यकीय (धर्मार्थ) सेवा पुरवली व्याधीमुक्त करणारा म्हणजे परमेश्वरच ठरतो याची जाणीव फक्त व्याधीग्रस्तालाच होते हे काम श्रीमंत प्रताप शेठजींनी केले त्या काळात मुंबईसारख्या ठिकाणी मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा अंमळनेर सारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेला माफक मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिल्या.ज्यांच्याकडे पैसा होता ते पुढे मुंबई,बडोदा येथे शिकायला जायचे पण ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी काय करायचे अशा सर्वसामान्य माणसाला माध्यमिक उच्च महाविद्यालयीन शिक्षणाची सोय सहजपणे उपलब्ध करून दिली. ज्ञान देणाऱ्यांपेक्षाही ज्ञानदानाची सोय उपलब्ध करून देणारा श्रेष्ठ ठरतो केवळ भौतिक ज्ञान उपयोगाचे नसून मानवाला खरी मुक्ती मिळावी असे वाटत असेल तर भक्ती आणि भक्ती पलीकडे आहे. एक आत्मानंद त्याची प्राप्ती त्यांनी श्रीराम मंदिर,(दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी) सध्याचे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र यांच्या द्वारा उपलब्ध करून दिली. या सर्व गोष्टी विचारात घेता श्रीमंत प्रताप शेठजींच्या एक ऐतिहासिक व्यक्ती इतिहास पुरुष म्हणून त्यांच्याकडे बघणे आवश्यक ठरते अशा योजकस्तत्र दुर्लभ:! म्हणून श्रीमंत प्रताप शेटजींवर त्यांच्या जीवनचरित्राचा कार्याचा अल्पसा प्रयत्न या लेखात केला आहे. या प्रयत्नाचा इतिहासाच्या दृष्टिकोनातूनही विचार व्हावा ही अपेक्षा श्रीमंत प्रतापशेजींचा जन्म राजस्थानातील कालाडेरा येथे दिनांक ११ डिसेंबर १८७९ रोजी झाला घरची गरिबी असल्यामुळे श्रीमंत प्रतापशेठ लहानपणी गुरे, शेळ्या, मेंढ्या, उंट चारत होते.त्यांना कोणत्याही प्रकारची अक्षर ओळख नव्हती मात्र त्यांचे कुटुंब आध्यात्मिक, धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले होते. त्यांच्या जीवनात दहा वर्षाचे असताना बदल घडून आला खान्देशात चोपडा येथे रतिरामशेठ नावाचे गृहस्थ राहत होते त्यांनी त्यांना दत्तक घेतले व अक्षर ओळख नसलेल्या रामप्रतापचे नाव मोतीलाल असे ठेवण्यात आले. दत्तक घेतलेल्या मात्या पित्यांनी त्यांना शाळेत घालून शिक्षणाची व्यवस्था केली तर श्री. सावळाराम बाळाजी नाईक यांनी सतारवादन मराठी, संस्कृत व अध्यात्म तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली. मास्तरांकडून निवृत्ती व प्रवृत्तीची शिकवण मिळाली सत्कर्मा द्वारे जीवन समृद्ध करता येते या विचारांची जाणीव मास्तरांनी श्रीमंत प्रतापशेठजींना करून दिली.आणि शेठजींची आंतरिक दृष्टी विकसित झाली. आणि याच दृष्टीने श्रीमंत प्रतापशेठजींना एक समाज उपयोगी म्हणून नावलौकिक प्राप्त करून दिला. या श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
*लेखक-प्रा. डॉ. मनीष रघुनाथ करंजे,
राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा*