अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील यांना राज्य सरकारने पेन्शन केली लागू.
सविस्तर वृत्त असे की, राज्यातील अनेक वृत्तपत्र समूहात काम करणाऱ्या पत्रकारांना तुटपुंज्या मानधना वर समाधान मानावे लागत आहे. या मानधनातून कुटुंबातील गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना नाकीनऊ येत आहे.त्यांच्या सह परिवाराच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यातील बहुतांश पत्रकारानां मानधन सुद्धा मिळत नाही. जाहिराती वर अवलंबून रहावे लागत आहे. अनेक वर्षे पत्रकारिता करून ही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यांना म्हतार वयात आधार मिळावा म्हणून अधिस्वीकृती धारक पत्रकारांना राज्य सरकारने पेन्शन सुरू करावी म्हणून अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील यांनी पहिल्यांदा सदरची मागणी राज्य सरकार कडे केली.तब्बल वीस वर्षे लढा त्यांनी दिला. वेळ प्रसंगी त्यांना राज्य सरकारशी झगडावे लागले.आमदारांना जर पेन्शन लागू होत असेल तर पत्रकारांना का पेन्शन मिळू शकत नाही, असा सवाल त्यांनी सरकार पुढे मांडला.त्यांच्या लढ्याला यश मिळाले व राज्य सरकारने पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना घोषणा केली. सुरुवातीला पाच हजार, नंतर अकरा हजार तर आता ती रक्कम वीस हजारावर येऊन ठेपली आहे. याचे श्रेय ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील यांना जाते.मात्र सुभाष पाटील यांना या योजनेचा लाभ तब्बल वीस वर्षां नंतर मिळाला. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. सदर यादीत जळगांव जिल्ह्यातील सात ज्येष्ठ पत्रकारांचा समावेश आहे.ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळूखे,प्रकाश पत्की,सुभाष पाटील,धोंडू गुरव,प्रकाश जगताप,शिवलाल बारी,मूकुंद एडके आदींचे नावाचा उल्लेख आहे.
पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांस मदत करण्याच्या उद्देशाने शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीची स्थापना १ ऑगस्ट २००९ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली.त्याचे राज्यातील प्रथम लाभार्थी ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील असल्याचे त्यांनी सांगितले.
सुभाष पाटील यांचा थोडक्यात परिचय…
सुभाष पाटील हे मूळचे चोपडा तालुक्यातील घोडस गावचे रहिवासी. त्यांचा जन्म सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात दि १५ ऑगस्ट १९४७ रोजी झाला.त्यांना लहानपनां पासून कविता लिहिण्याची आवड होती. त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. विविध विषयांवर लिखाण करण्याची आवड असल्याने त्यांनी प्रथम सन १९६८ मध्ये दैनिक बातमीदार या वृत्तपत्रासाठी वृत्तांकन करण्यास सुरुवात केली. त्यांनी दैनिक जन शक्ती,दैनिक लोकमत,दैनिक आपला महाराष्ट्र सारख्या वृत्त पत्रात देखील काम केले आहे. त्यांनी स्तभं लेखनावर अधिक भर दिला.त्यांना सन १९९० मध्ये त्यांच्या “अंधारातील दिवे” या स्तभं लेखनाला वृत्तपत्र क्षेत्रातील राज्य पुरस्कार मिळाला आहे. यासह त्यांना दिल्ली येथील अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी ने सुद्धा पुरस्काराने सन्मानित केले आहे. आज ही ते नवीन पत्रकार बांधवांना मार्गदर्शन करत असतात.