मित्रांनो रोजच्या धावपळीत, कामाच्या गडबडीत आपले स्वत:कडे नेहनीच दुर्लक्ष होत असते. कामालाच सर्वस्व मानणारे आपण अगदी मशीनसारखे स्वत:ला त्यात गुंतवून घेत असतो. मात्र स्वत:कडे नीट लक्ष न दिल्यामुळे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याची हेळसांड, हानी होत असते. आणि त्याचे परिणाम लगेच दिसून येत नसले तरीही कालांतराने दिसून येतात. आणि मग ‘तहान लागली की विहिर खणण्याचा’ प्रकार सुरु होतो. आणि त्यात यश येईलच याचीही खात्री नसते. आपल्यासाठी इतर सर्व गोष्टी कितीही महत्त्वाच्या असल्या तरी सर्वात महत्त्वाचे असतो ते आपण स्वत: !
मोबाईल जसा बॅटरी डाऊन होत आल्यावर आपण वारंवार चार्ज करतो तसंच आपलंही असतं. मोबाईलला आपण महत्त्व देतो, जपतो पण स्वत:कडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:ला फिट आणि फाईन ठेवणे ही आपलीच तर जबाबदारी असते. काम, पैसाअडका, नाती गोती वैगेरे गोष्टी आपल्या नंतर येतात…सिर सलामत तो पगडी पचास ! म्हणूनच स्वत:ला प्रथम प्राधान्य द्यायला हवे.
आपणच नीट,आरोग्यदायी नसू तर बाकी गोष्टी नगण्य आहेत. म्हणूनच खुप सारा वेळ नाही मात्र २४ तासातला अवघा १ तास आपण स्वत:साठी नक्कीच द्यायला हवा…बरेच जण विचार करतील की आम्हाला तेवढा वेळ मिळतच नाही..मात्र अशा लोकांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की तुम्ही दिवसभरात १०० टक्के जरी बिझी असलात तरी रोज जेवणासाठी कसाही अर्धा तास काढताच ना?
दैनंदिन शारीरिक उत्सर्जन क्रिया करण्यासाठी रोजच तेवढा वेळ आपण काढतोच ना? होय, कारण या गोष्टी आपल्याला टाळताच येत नाहीत…मात्र स्वत:साठी वेळ द्यायला मात्र आपण हात आखडता घेतो. आणि मग आयुष्यात त्याचे काही ना काही नकारात्मक परिणाम आपल्याला नक्कीच दिसून येतात.
●रोज स्वत:साठी १ तास काढणे किती आवश्यक आहे?
स्वत:साठी रोज १ तास काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण यामुळे मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुधारते. हा वेळ आपल्याला आराम, विचार, आवडीचे कामे आणि स्वच्छंदपणे घालवण्यासाठी उपयोगी पडतो. हे स्वतःला रिचार्ज करण्यासाठी आणि दैनंदिन ताणतणाव कमी करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरते.
●त्या १ तासात आपण स्वत:साठी काय काय करु शकतो?
त्या १ तासात आपण स्वत:साठी अनेक गोष्टी करू शकतो, ज्या आपल्या आवडी आणि गरजांनुसार ठरवल्या जाऊ शकतात. खाली काही पर्याय दिले आहेत त्यातील तुम्हाला आवश्यक वाटतील ते तुम्ही गरजेनुसार निवडू शकता.
१.व्यायाम-
व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. व्यायाम केल्याने हृदय, फुफ्फुस, आणि इतर अवयवांची कार्यक्षमता सुधारते. नियमित व्यायामाने शरीरातील चरबी कमी होते, स्नायू बळकट होतात, आणि ऊर्जा पातळी वाढते. व्यायाम केल्याने मनःशांती मिळते, तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच व्यायाम केल्याने हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांचे धोके कमी होतात. नियमित व्यायाम केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते, वजन नियंत्रित ठेवता येते. वजन असलेले व्यायामप्रकार केल्याने हाडे आणि सांधे मजबूत होतात. व्यायामाच्या या फायद्यांमुळे, ते आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या वयानुसार आपण योगा, धावणे, चालणे किंवा जिममध्ये जाणे असे व्यायामप्रकार निवडू शकतो.
२. ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम-
ध्यानामुळे मन:शांती आणि स्थिरता प्राप्त होते. ज्यामुळे तणाव कमी होतो. नियमित ध्यानामुळे भावनांची अधिक समज येते आणि त्या नियंत्रित करण्यास मदत होते. ध्यानामुळे एकाग्रता आणि लक्ष केंद्रीत होण्याची क्षमता वाढते. ध्यानामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे स्वास्थ्य सुधारते. तसेच अनिद्रा आणि झोपेच्या समस्या कमी होतात.
श्वासोच्छवासाचे व्यायामप्रकार केल्याने तणाव कमी होतो. डीप ब्रिदिंगमुळे शरीरातील तणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात. यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे ऊर्जा स्तर सुधारतो. श्वासोच्छवासाचे व्यायाम रक्ताभिसरण सुधारण्यासही मदत करतात. ते मनःशांती मिळवण्यासाठीही उपयुक्त आहेत. यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते आणि श्वसनाचे विकार कमी होतात. ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम एकत्रितपणे केल्यास शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारते.
३. वाचन करणे-
दररोज वाचन केल्याने अनेक फायदे होतात. वाचनामुळे आपले ज्ञान वाढते आणि विविध विषयांबद्दल माहिती मिळते. वाचनामुळे मन शांत होते आणि ताण कमी होतो. तसेच लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. वाचनामुळे आपली भाषाशैली आणि शब्दसंग्रह सुधारतो. विविध कथा आणि विषय वाचल्याने सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढते. वाचनामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते. विविध संस्कृती आणि जीवनशैलींबद्दल माहिती मिळाल्याने समाजाविषयीची समज वाढते. यामध्ये आपण आवडीची पुस्तके, लेख किंवा कविता वाचू शकतो.
४. लेखन करणे-
लेखन करण्याचेही बरेच फायदे आहेत. लेखन करताना आपल्या विचारांची स्पष्टता वाढते. लेखनाच्या माध्यमातून आपण इतरांसोबत विचार विमर्श करू शकतो, ज्यामुळे आपले विचार समृद्ध होऊ शकतात. लेखन करताना आपण आपल्या विचारांची नोंद घेत असतो ज्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते. यामध्ये आपण डायरी लेखन, कथा, कविता किंवा लेख लेखन करु शकतो.
५.संगीत-
आवडते संगीत ऐकण्याने तणाव कमी होण्यास मदत होते आणि मानसिक शांतता मिळते. आवडती गाणी ऐकल्याने मन आनंदित होते आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते. आपल्या सर्जनशील विचारांना प्रोत्साहन मिळते तसेच नव्या कल्पनांना उभारी मिळते. संगीताचा प्रभाव व्यक्तीवर अवलंबून असतो, त्यामुळे कोणते संगीत आपल्याला फायदेशीर ठरते हे शोधणे महत्त्वाचे आहे.
६. छंद जोपासणे-
आयुष्यात एखादा छंद जोपासण्याचे अनेक फायदे आहेत. छंदामुळे आपले मन एकाग्र होते आणि तणाव कमी होतो. तसेच आपली सर्जनशीलता वाढते आणि नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. एखाद्या छंदात प्रावीण्य मिळवल्यास आपला आत्मविश्वास वाढतो. छंदामुळे नवीन लोकांशी ओळख होते आणि आपले सामाजिक संबंध सुधारतात. छंदामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि जीवनात मनोरंजनाचा एक स्रोत तयार होतो. छंद कोणताही असो, तो आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देतो आणि जीवन अधिक समृद्ध बनवतो. चित्रकला, हस्तकला, बागकाम वैगेरेसारखे अनेक छंद आहेत जे आपण जोपासू शकतो.
८.स्वयंविकास-
ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या होत्या मात्र आयुष्यात राहून गेल्या अशा गोष्टी किंवा नवनवीन कौशल्ये आपण शिकू शकतो. त्यासाठी वेळ देऊ शकतो. जसे की गायन, वादन, पोहणे, हस्तकला, चित्रकला वैगेरे.
९. कुटुंबाला वेळ देणे –
बरेचजण स्वत:ला कामात इतके व्यस्त करुन घेतात की त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांशी बोलायला सुद्धा वेळ नसतो. आणि मग हीच सवय बनून जाते. पुढे जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हाही कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा टप्पा मारायला किंवा चर्चाविनिमय करण्याला प्राधान्य दिले जात नाही. या प्रकारामुळे मग मोबाईलसारखी व्यसने जडतात जिथे व्हर्चूअलरित्या कुणीना कुणी बोलायला उपलब्ध होत असते. आणि मग प्रत्यक्ष जीवनातून आभासी जीवनाकडे वाटचाल सुरु होते आणि तेच हवेहवेसे वाटते. म्हणूनच आपण कुटुंबासह वेळ घालवणे आवश्यक आहे जसे की आवडते चित्रपट पाहणे. फिरायला जाणे वैगेरे.
मित्रांनो हा ‘एक तास’ म्हणजे जणू काही जीवन संजीवनी आहे. त्याचे वेळीच महत्त्व जाणा नाहीतर भविष्यात स्वत:साठी अनेक तास देऊनही उपयोग होत नाही….कारण वेळ निघून गेलेली असते !
@@@@@@@@@@@@@@@@
प्रा डॉ विजय तुळसाबाई शालिग्राम गाढे
मुख्य संपादक,करडी नजर न्युज