अमळनेरकरानो मॉल संस्कृती जपण्या पूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा…..

संपाकीय……विशेष

       अमळनेरला संताचा वारसा लाभलेला आहे. भारत देशात इंग्रजांची जुलमी राजवट असतानां स्वातंत्र्याच्या चळवळीत अमळनेरकरानां जबाबदारीची जाणीव करून देणारे मातृहृद्यी साने गुरुजी व पोटातील बाळाची तमा नबाळगता स्वातंत्र्याच्या अग्नीत आपल्या पती सह उडी घेणाऱ्या क्रांती विरंगणा लीलाताई व उत्तमराव पाटील यांच्या सारखे विभूती याच भूमीत जन्माला आलेले आहे.तर अमळनेरला उद्योग नगरीचा दर्जा प्राप्त करून देणारे श्रीमंत प्रताप शेठ ज्यांनी हजारो अमळनेरकरानां पोटाला लावले त्यांची व ज्यांची ख्याती जगभरात सर्वत्र असलेले उद्योगपती हशिमजी प्रेमजी यांची कर्मभूमी म्हणजे अमळनेर होय.

वरील सर्व महान विभुतींच्या पद स्पर्शाने पावन अश्या भूमीतील लोक ही अगदी प्रेमळ व सामाजिक सलोखा जपणारी आहेत.दुसऱ्याचे दुःख ते आपले दुःख समजून एकमेकांच्या मदतीला धावून जाणारी संस्कृती जतन करण्यासाठी प्रयत्नशील असलेले अमळनेरकर होय.याठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत.कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या संकट काळात जात – धर्म खुंटीला टांगून माणुसकी जपणारी ही मानस.या काळात स्वताच्या रक्ताच्या नात्याला कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांना स्मशान भूमीत घेऊन जाण्यास ही कोणी धजत नसतांना मुस्लिम समुदायातील तरुणांनी निस्वार्थ हिंदू पद्धतीने अंत्य संस्कार केले.यालाच माणुसकी धर्म म्हणातात.

अमळनेर मध्ये प्रताप मिल चालू असताना आर्थिक भरभराटी होती.छोटे मोठे उद्योगाला चालना मिळत होती.मात्र जसेही प्रताप मिल बंद झाली तसे हजारो परिवार उघड्यावर पडली.कुटुंबाची आर्थिक घडी बिघडल्या मुळे पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षा चालविणे,किराणा दुकान,मोटार दुरुस्ती,भाजीपाला विक्री,किरकोळ व्यापार सुरू केले व आपल्या कुटुंबासह जीवन जगू पाहत आहे.संसाराचा गाडा जेमतेम चालवीत आहे.मोठी उद्योग कंपनी नसल्याने कुटुंबाला आधार मिळावा म्हणून मुंबई – पुणे व सुरत याठिकाणी काम धंदा करण्यास अमळनेर सोडून गेले आहे.अश्या भयानक परिस्थिती आज अमळनेरकर जीवन कठत आहेत.

मात्र सध्या अजून मोठे संकट अमळनेरकरांच्या डोक्यावर घोंगावतानां दिसत आहे.लहान सहान उद्योग करून परिवाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्यांच्या आजूबाजूला मॉल रुपी गिधाड घिरट्या घालू लागले आहे.विदेशी मॉल संस्कृती इथे रुजू पाहत आहे.एकाधिकार मालकी प्रस्थापित होण्यासाठी सज्ज झाली आहे.सुरुवातीला ग्राहकांना सवलतीचे गाजर दाखवून प्रलोभन दाखवून भुरळ घातली जात आहे.याला लोक बळी पडू शकतात. आम्ही मॉल मध्ये खरेदी करतो अशी शेकी मिरविण्याची संस्कृती हळू हळू अमळनेर मध्ये प्रस्तापित होईल.यामुळे एकल व्यापारी हे धनदांडगे होतील.

अमळनेर मध्ये मॉल संस्कृती रुजल्यास शहरातील लहान सहान उद्योग करून कुटुंबाच्या गरजा जेमतेम चालवीत असलेले लवकरच रस्त्यावर येऊ शकतात.कुटुंब उध्वस्त होऊ शकते.किरकोळ व्यापार बंद होतील.कारण सुरुवातीला बाजार भाव पेक्षा कमी दरात ग्राहकांना वस्तू मॉल मध्ये मिळू लागल्याने ते मॉल मध्येच खरेदी करण्यास प्राधान्य देतील.या मुळे शहरातील किरकोळ व्यापार करणाऱ्यांचे दुकानानां ग्राहक मिळणार नाहीत.जो ग्राहक एका दुकानात कपडे,दुसऱ्या दुकानात भांडे,तिसऱ्या दुकानात कांदे,चौथ्या ठिकाणी टमाटे,पाचव्या ठिकाणी भाजीपाला,सहाव्या ठिकाणी किराणा खरेदी करून आपल्या जवळील पैशाचा विनिमय करीत आहे.असे होत असल्याने एका ग्राहकाच्या खरेदी मुळे अनेक कुटुंब जगत आहेत.मात्र मॉल संस्कृती मुळे ग्राहकाला एकाच छता खाली आवश्यक वस्तू बाजार भावा पेक्षा कमी दरात मिळत असल्याने मॉल मध्ये खरेदी केल्यास ग्राहकाचा पैसा निव्वळ त्या मॉल मालकाच्या खिशात जाईल.असे झाल्याने तो मॉलच्याच मालकाकडे पैसा एकवटेल.दुसरी कडे मात्र ग्राहक नमिळाल्याने छोटे छोटे उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढेल.बेरोजगारी वाढल्याने अप्रत्यक्ष गुन्हेगारीला चालना मिळेल . गुण्या गोविंदाने चालणाऱ्या शहरात लुटपात सुरू होईल.यामुळे शहराची शांतता भंग पावेल.अनेक पिढ्या बरबाद होतील.अमळनेरचा उज्वल इतिहास नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.

आम्हीं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अमळनेर नागरिकांना आवाहन करतो की,आपल्याला लाभलेला संताच्या विचारांचा वारसा ,माणुसकी व आपसातील जिव्हाळा कायम रहावा व मूळ अमळनेरकरा वरील मॉल संस्कृती रुपी गिधाड आपल्या मानगुटीवर बसू नये म्हणून जागृत राहून हे संकट कायमस्वरूपी हटवण्यासाठी ठोस भूमिका घेऊ.माझ्या कुटुंबाला लागणाऱ्या वस्तू मी बाजारातील किरकोळ बाजारात जाऊनच खरेदी करणार,अशी शपथ घेऊन माणुसकी जपुया…आणि अनेकांचे आधारवड होऊ या.

आपणच आहोत अंमळनेरकरांच्या जीवनाचे शिल्पकार

 

जय सखाराम महाराज….जय अमळनेरकर….

 

मा प्रा डॉ विजय तुळसाबाई शालिग्राम गाढे

मुख्य संपादक,करडी नजर न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!